हत्तीरोग निर्मूलनासाठी गडचिरोली–चामोर्शीत एमडीए-आयडीए मोहिम

134

१० ते २३ फेब्रुवारीदरम्यान सार्वत्रिक औषधोपचार

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.६ : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिम (एमडीए/आयडीए) दिनांक १० ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत गडचिरोली व चामोर्शी तालुक्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तीन औषधांचा एकदाच डोस देण्यात येणार आहे.
या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आज (६ फेब्रुवारी २०२६) जिल्हा हिवताप कार्यालय, गडचिरोली येथे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुजिता वाडिवे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी हत्तीरोग हा क्युलेक्स जातीच्या डासांमुळे होणारा गंभीर संसर्गजन्य आजार असून दूषित पाणी, गटारे व सांडपाण्यात वाढणाऱ्या डासांमुळे तो पसरतो, अशी माहिती देण्यात आली. या आजाराची लक्षणे उशिरा दिसून येतात व वेळेवर उपचार न झाल्यास हात-पाय सूजणे, अंडवृद्धी यांसारख्या कायमस्वरूपी विकृती निर्माण होतात.
शासनामार्फत दिली जाणारी औषधे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत मोफत देण्यात येणार असून ती रिकाम्या पोटी घेऊ नयेत तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसमोरच सेवन करणे आवश्यक आहे. २ वर्षांखालील मुले, गर्भवती महिला व गंभीर आजारी व्यक्तींना ही औषधे देण्यात येणार नाहीत.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी पात्र लाभार्थ्यांनी औषधांचे सेवन करून मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.
पत्रकार परिषदेला हत्तीरोग अधिकारी डॉ. रुपेश पेंदाम, तालुका आरोग्य अधिकारी चामोर्शी डॉ. महेंद्र पेद्दाला, राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (PCI, दिल्ली) डॉ. मिथिलेश सिंग, जिल्हा व्हीबीडी सल्लागार राजेश कार्लेकर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.