सूरजागडहून जाणाऱ्या भरधाव ओव्हरलोड ट्रकची दुचाकीला धडक; महिलेचा जागीच मृत्यू, पती गंभीर

349

– मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटून परतताना आईचा भीषण अपघातात मृत्यू

लोकवृत्त न्यूज
बल्लारपूर : सूरजागडहून घुग्घुसकडे जाणाऱ्या एका भरधाव ओव्हरलोड ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर बसलेल्या महिलेचा ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक पती गंभीर जखमी झाला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी दि. ६ फेब्रुवारी २०२६ दुपारी सुमारे २.३० वाजता बल्लारपूर शहरातील बीटीएस चौक परिसरात घडली.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव नीलिमा देवराव रोहनकर (वय ३७, रा. जटपुरा गेट, चंद्रपूर) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहनकर दाम्पत्य आपल्या मुलाच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटून गोंडपिपरीहून चंद्रपूरकडे दुचाकीने परतत होते. दरम्यान सूरजागडहून येणाऱ्या ओव्हरलोड ट्रकने (क्रमांक एमएच ३३ टी ३८९०) मागून भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत दुचाकीला धडक दिली.
धडकेनंतर ट्रकच्या मागील चाकाखाली नीलिमा रोहनकर सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर पती देवराव रोहनकर गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन दिवटे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून जखमीवर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून सूरजागड मार्गावरील ओव्हरलोड व भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या अपघाताचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन दिवटे करीत आहेत.