‘डेथ झोन’ ठरतोय चांदाळा–कारवाफा मार्ग : चार दिवसांत दुसरा बळी

330

‘डेथ झोन’ ठरतोय चांदाळा–कारवाफा मार्ग : चार दिवसांत दुसरा बळी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : गडचिरोली–चांदाळा–कारवाफा हा मार्ग सध्या अपघातांचा ‘डेथ झोन’ ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. रविवारी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात विहीरगाव येथील २९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले. अवघ्या चार दिवसांपूर्वी याच मार्गावर एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका तरुणाचा बळी गेल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
संतोष हिरामण गोमसकर (वय २९) असे मृत तरुणाचे नाव असून हिरामण सखाराम गोमसकर (वय ६०) असे जखमी वडिलांचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष हा आपल्या वडिलांना दुचाकीवर घेऊन विहीरगावहून गडचिरोलीकडे येत होता. चांदाळा–कारवाफा मार्गावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत संतोषचा जागीच मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या मार्गावर सध्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून, त्यामुळे अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. अपुऱ्या सुरक्षाव्यवस्था, वेगमर्यादा फलकांचा अभाव आणि वाहतूक नियंत्रण नसल्याने अपघातांची संख्या वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. काही दिवसांपूर्वीच रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या टँकरच्या धडकेत जांभळी येथील १६ वर्षीय विद्यार्थिनी रिया श्रावण पदा हिचा जागीच मृत्यू झाला होता.
वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे चांदाळा–कारवाफा मार्गावर तातडीने पोलीस बंदोबस्त, वेगमर्यादा अंमलबजावणी, सूचना फलक व रात्रीच्या वेळी योग्य प्रकाशव्यवस्था करण्याची जोरदार मागणी होत आहे. प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना न केल्यास आणखी जीव जाण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.