‘देवा भाऊंच्या लाडक्या बहिणी’ आमरण उपोषणाच्या तयारीत अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली आर्थिक फसवणूक

1296

पिपरे दाम्पत्यावर महिलांचा संताप

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. ९ :- चामोर्शी अगरबत्ती प्रकल्प उभारून रोजगार देण्याच्या नावाखाली महिलांची कोट्यवधींची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत चामोर्शी येथील महिलांनी नगरसेवक आशिष अरुण पिपरे व पत्नी नगरसेविका सोनाली आशिष पिपरे यांच्या विरोधात संतापाचा उद्रेक केला. आज सोमवार ९ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेतून प्रशासनाला थेट इशारा देत, न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणासह आत्मदहनाचा टोकाचा मार्ग स्वीकारू, असे जाहीर केले.

पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार, २०२० मध्ये पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेअंतर्गत अगरबत्ती निर्मितीचा प्रकल्प सुरू करून गरीब शेतकरी व शेतमजुरांना रोजगार देण्याचे आमिष दाखवण्यात आले. सुमारे ४० महिलांना बैठकीस बोलावून बँकेकडून कर्ज मंजूर करून देतो व ते कर्ज माफ करून दिले जाईल, अशी खोटी आश्वासने देण्यात आली. बँकेशी संगनमत करून प्रत्येकी सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज महिलांच्या नावावर मंजूर करून घेतले व त्यातील रक्कम स्वतःकडे वळविल्याचा आरोप महिलांनी केला.

महिलांच्या नावावर मंजूर झालेल्या कर्जातून हलक्या प्रतीच्या अगरबत्ती मशीन खरेदी करून त्या स्वतःच्या ताब्यात ठेवल्या. नवीन जमीन खरेदी करून मोठा शेड उभारून प्रकल्प सुरू करण्यात आला, मात्र अवघ्या काही महिन्यांतच प्रकल्प बंद पडला. त्यानंतर बँकांकडून कर्जफेडीच्या नोटिसा येऊ लागल्यानंतर महिलांनी मशीन देण्याची किंवा रोजगार सुरू करण्याची मागणी केली असता, “कर्ज तुम्हालाच भरावे लागेल” असे सांगून त्यांना हाकलून लावल्याचा आरोप आहे.

गेल्या तीन वर्षांपासून कर्ज माफ करून देतो, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू आहे, असे सांगत वेळकाढूपणा करण्यात आला. अखेर बँकांनी न्यायालयीन कारवाई करत मोठ्या रकमेच्या नोटिसा पाठवल्याने महिलांवर जप्तीची भीती निर्माण झाली. नागपूर येथील जनता दरबारात मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर चौकशीचे आदेश होऊनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या प्रकरणामुळे अनेक कुटुंबांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कर्जाच्या भीतीने आत्महत्येपर्यंतची वेळ आल्याची व्यथा महिलांनी मांडली. राजकीय आशीर्वादामुळेच आरोपींवर कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला.

पीडित महिलांनी पिपरे दाम्पत्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्या अमाप संपत्तीची SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. अन्यथा २३ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्यात येईल; त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन व संबंधितांवर राहील, असा ठाम इशाराही महिलांनी दिला आहे.