जमीनच नाही तर प्रकल्प कसा? वरद फेरो अलॉयजच्या जनसुनावणीवर शेतकऱ्यांचा संताप

182

जमीनच नाही तर प्रकल्प कसा? वरद फेरो अलॉयजच्या जनसुनावणीवर शेतकऱ्यांचा संताप

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक येथे प्रस्तावित २,५०० कोटींच्या पोलाद प्रकल्पासाठी आयोजित जनसुनावणी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मेसर्स वरद फेरो अलॉयज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ७८ हेक्टर जमिनीचे अधिग्रहणच पूर्ण झाले नसताना पर्यावरण जनसुनावणी घेण्यात आल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
जमीनच संपादित झालेली नसताना प्रकल्प हवेत उभारणार का? असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी ही संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान पर्यावरण आघात मूल्यांकन (EIA) अधिसूचना २००६ मधील तरतुदींनुसार, कोणत्याही प्रकल्पाची जनसुनावणी घेण्यापूर्वी संबंधित जागा निश्चित असणे आणि त्या जमिनीवर प्रकल्प प्रवर्तकाचा कायदेशीर अधिकार असणे आवश्यक आहे. जमिनीचे संपादन पूर्ण न झाल्यास ‘प्रकल्पबाधित’ नेमके कोण, हे स्पष्ट होत नाही.
मात्र, या प्रकरणात अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन देण्यास स्पष्ट नकार दिलेला असतानाही प्रशासनाने जनसुनावणीचा सोपस्कार पार पाडल्याचा आरोप करण्यात येत आहे.
आमची जमीन आमच्या मालकीची असताना तिथे जनसुनावणी घेण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण न करता पुढील टप्प्यावर जाणे म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणे होय, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मितीची शक्यता व्यक्त केली जात असली तरी स्थानिकांच्या संमतीशिवाय कोणताही उद्योग उभा राहू देणार नाही, असा इशारा शेतकरी वर्गाने दिला आहे.
मुधोली चक परिसरातील हा वाद आता केवळ एका प्रकल्पापुरता मर्यादित न राहता, उद्योगविकास विरुद्ध जमीनहक्क या व्यापक प्रश्नावर केंद्रित होत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.