कुंडलवाडीत काळाबाजारावर पोलिसांचा दणका ; १.११ लाखांचा मुद्देमाल जप्त
लोकवृत्त न्यूज
कुंडलवाडी :- शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल समोरून काळ्या बाजारासाठी गहू घेऊन जाणारा ऑटो पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पकडला. या कारवाईत एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे दीड वाजताच्या सुमारास ऑटो क्रमांक टी.एस.१६ यूबी २४१२ हा संशयास्पदरीत्या जात असताना कुंडलवाडी पोलीस ठाणे येथील सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस कर्मचारी रघुवीरसिंह चौहान, व्यंकट घोंगडे तसेच स्थानिक नागरिक साहेबराव कोंडावार, योगेश गडपवार, अनिल कोटलावार, मनोज मठ्ठमवार, राजेश हमंद, मोहन समेटवार आणि प्रशांत गडपवार यांनी तत्परता दाखवत वाहन अडवले.
तपासणीदरम्यान ऑटोमध्ये ५० किलो वजनाचे ११ गव्हाचे पोते आढळून आले. संबंधित गव्हाची किंमत सुमारे ११ हजार रुपये असून ऑटोची किंमत अंदाजे १ लाख रुपये आहे. असा एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणाची नोंद स्टेशन डायरीत करण्यात आली असून जप्त धान्याचे नमुने तपासणीसाठी तसेच पुढील कायदेशीर कारवाईसाठी बिलोली तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली.
दरम्यान, शासकीय धान्याचा काळाबाजार रोखण्यात महसूल व पुरवठा विभाग अपयशी ठरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. शहरातील शासकीय गोदामातून होणारा संभाव्य घोटाळा तसेच स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांची होणारी फसवणूक यावर नियंत्रण का ठेवले जात नाही, असा सवाल जनमानसातून उपस्थित केला जात आहे.











