धक्कादायक : गडचिरोली जिल्हा महिला-बाल रुग्णालयात ११ महिन्यांच्या बालिकेचा संशयास्पद मृत्यू

743

• डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप, चौकशीची मागणी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ०५ : जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथील बालरोग विभागात उपचार सुरू असलेल्या ११ महिन्यांच्या वंशिका साजन लेनगुरे (रा. दिभना) या चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत असून या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी संबंधित डॉक्टरांकडून घटनेची माहिती घेत संताप व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, उपचार सुरू असताना सुमारे दोन तासांपूर्वीपर्यंत बालिकेची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबीयांना सांगण्यात आले होते. मात्र अचानक तिची प्रकृती बिघडल्याचे सांगत काही वेळातच मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे दोन तासांपूर्वीपर्यंत बरी असल्याचे सांगितलेल्या बालिकेचा अचानक मृत्यू कसा झाला, असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले की, गडचिरोली हा आदिवासी व दुर्गम जिल्हा असून येथील गरीब नागरिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयांवरच अवलंबून असतात. मात्र डॉक्टरांची कमतरता, अपुरी साधनसामग्री आणि काही ठिकाणी डॉक्टर-कर्मचाऱ्यांची निष्काळजी वृत्ती यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असतानाही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची स्थिती चिंताजनक असल्याची टीकाही त्यांनी केली. जिल्हा महिला व बाल रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या रुग्णालयात अशा घटना घडणे अत्यंत गंभीर असून या प्रकरणातील सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी त्यांनी केली.
या घटनेची सखोल चौकशी करून जर कोणत्याही डॉक्टर किंवा अधिकाऱ्यांची निष्काळजीपणा आढळून आला, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देऊन रिक्त डॉक्टर पदे तात्काळ भरावीत, अशी मागणीही ब्राह्मणवाडे यांनी केली.
दरम्यान, अशा प्रकारच्या घटना पुढेही घडत राहिल्यास प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देत गरीब जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणाला माफी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिवसेना पक्षाचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हा युवा अधिकारी पवन गेडाम, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, नंदुजी कुमरे, धनराज जेंगठे, अण्णाजी जेंगठे, विलास जेंगठे, साजन लेनगुरे, हिवराज गुरनुले, दामोदर उईके, विलास गावतुरे, छगन लेनगुरे, सोमेंद्र गावतुरे, शेषराव मेश्राम, देविदास जेंगठे, गणेश गेडाम, सुरेश जेंगठे, सुभाष गुरनुले आदी उपस्थित होते.