लाडबोरी शेतशिवारात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला

277

• ओळख पटविण्यासाठी सिंदेवाही पोलिसांचे नागरिकांना आवाहन

लोकवृत्त न्यूज
सिंदेवाही : सिंदेवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाडबोरी येथील शेतशिवारात एका अंदाजे ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह बुधवारी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यादव शेंडे यांच्या शेतात हा मृतदेह पडून असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मृत व्यक्तीच्या अंगात लाल रंगाचा शर्ट आणि निळसर रंगाची फुल पँट असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्राथमिक अंदाजानुसार संबंधित व्यक्तीचा मृत्यू दारूच्या नशेत उन्हाचा तीव्र तडाखा व पाण्याच्या अभावामुळे झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेहाच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमांच्या खुणा आढळल्या नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
या संदर्भात सिंदेवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार कांचन पांडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या वर्णनाशी जुळणारा कोणी व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा मृत व्यक्तीची ओळख पटत असल्यास तात्काळ सिंदेवाही पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
या प्रकरणी सिंदेवाही पोलीस अधिक तपास करीत आहेत.