गैरहजेरी महागात ; चिंगली ग्रामसेवकाचा पदभार तात्काळ हिसकावला

553

गैरहजेरी महागात ; चिंगली ग्रामसेवकाचा पदभार तात्काळ हिसकावला

लोकवृत्त न्यूज
धानोरा : सतत गैरहजर राहणे आणि कर्तव्यात कसूर करणे चिंगली गट ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजय येरमे यांना अखेर महागात पडले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी ‘ऑन द स्पॉट’ कारवाई करत येरमे यांच्याकडील पदभार तात्काळ काढून घेण्याचे आदेश दिले.
या आदेशानुसार पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील महत्त्वाच्या कागदपत्रांचा पंचनामा करून पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवला.
गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामविकास अधिकारी कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याने चिंगली ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला होता. विविध शासकीय योजना केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहिल्याने प्रत्यक्षात विकासकामांचा बोजवारा उडाला होता.
यासंदर्भात ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
नुकत्याच गाव भेटीदरम्यान संतप्त ग्रामस्थांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्यासमोर तक्रारी मांडल्या. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी तत्काळ कागदपत्रांची पाहणी करत पदभार बदलण्याचे निर्देश दिले.
यानंतर विस्तार अधिकारी बबलू आत्राम यांनी सरपंच सुंदरशहा तुलावी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालयातील कपाटे उघडून दस्तऐवजांचा पंचनामा केला.
या कारवाईनंतर संजय येरमे यांच्याकडील अतिरिक्त पदभार काढून तो सोडे येथील ग्रामविकास अधिकारी जिजा मडावी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
या धडक कारवाईमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे निष्क्रिय अधिकाऱ्यांवर अंकुश बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

“ग्रामपंचायतीतील दस्तऐवजांचा पंचनामा करून प्रशासकीय कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील कारवाईसाठी सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल.”
— बबलू आत्राम, विस्तार अधिकारी, पंचायत समिती धानोरा