मध्यरात्रीचा थरार! भरधाव कार हवेत उडाली, कारगील चौकात भीषण अपघात

1107

मध्यरात्रीचा थरार! भरधाव कार हवेत उडाली, कारगील चौकात भीषण अपघात

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : शहरातील चंद्रपूर मार्गावरील कारगील चौकात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक थरारक अपघात घडून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. भरधाव वेगातील चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने थेट हवेत झेप घेत रस्त्याच्या मध्यभागी पलटी घेतली.
प्राप्त माहितीनुसार, देव राहुल महात्मे (२२) हा युवक आपल्या चारचाकी वाहनाने चंद्रपूर मार्गावरून गडचिरोली शहराकडे येत होता. वाहनाचा वेग अत्यंत जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. कारने प्रथम रस्त्याच्या डाव्या बाजूचे कठडे तोडले आणि त्यानंतर दोन लोखंडी दिशादर्शक फलकांना जबर धडक दिली. धडकेनंतर कार तब्बल १०० फूट अंतर हवेत उसळून कारगील स्मारकाजवळ रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वाहन हे मारुती सुझुकी कंपनीचे ‘सिलेरिओ’ मॉडेल असून वाहन क्रमांक MH-31-EK-5991 असा आहे.
अपघाताचा मोठा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. उलटलेल्या वाहनातून जखमी चालकाला बाहेर काढून त्याला तातडीने मदत करण्यात आली. सुदैवाने वाहनात चालक एकटाच असल्याने मोठी जीवितहानी टळली. तसेच रामनवमीच्या निमित्ताने त्या वेळी रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने आणखी गंभीर दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, कारगील चौकात अल्पावधीत झालेली ही दुसरी मोठी अपघाताची घटना असून, या ठिकाणच्या वाहतूक सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी युवकाला रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.