Home Breaking News ‘नराधमाला फाशी द्या’च्या घोषणांनी चामोर्शी दणाणले

‘नराधमाला फाशी द्या’च्या घोषणांनी चामोर्शी दणाणले

174

• सात वर्षीय चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा, हजारो नागरिकांचा सहभाग

लोकवृत्त न्यूज
चामोर्शी दि. ११ जून :- सात वर्षीय चिमुरडीवरील अत्याचाराच्या अमानुष घटनेने संपूर्ण चामोर्शी शहर हादरून गेले असून, संतप्त नागरिकांचा उद्रेक गुरुवारी जनआक्रोश मोर्चाच्या रूपाने रस्त्यावर पाहायला मिळाला. ‘नराधमाला फाशी द्या’ या एकमुखी मागणीसाठी हजारो नागरिक, महिला, युवक तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून मोर्चेकऱ्यांनी पोलिस ठाण्यावर धडक देत आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.
चामोर्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८ जून रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. घराला रंगकाम करण्यासाठी आलेल्या प्रज्वल उर्फ नारू सदाशिव भांडेकर (वय २५) याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. ‘पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे’ आणि ‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
दरम्यान मोर्चा पोलिस ठाण्यावर पोहोचल्यानंतर आंदोलक महिलांनी पोलिस अधीक्षक घटनास्थळी येईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा घेतला. वाढता जनक्षोभ लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी तत्काळ चामोर्शी गाठले. त्यांनी पीडित कुटुंबीय आणि महिला प्रतिनिधींसोबत सविस्तर चर्चा करून तपासाच्या प्रगतीची माहिती दिली.
दोषीविरुद्ध कठोर कारवाई करून त्याला कायद्यानुसार कडक शिक्षा मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू असून पुढील ३० दिवसांत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या आश्वासनानंतर उपस्थित नागरिकांमध्ये काही प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात आले.
पीडित बालिकेच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान काही डॉक्टरांकडून हलगर्जीपणा आणि दिरंगाई झाल्याचा गंभीर आरोप महिला संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी केला. याबाबत वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले.
आंदोलनानंतर नगराध्यक्षा जयश्री वायलालवार, नगरसेविका अॅड. प्रेमा आईंचवार, वंदना चौथाले, वंदना म्हस्के, नगरसेवक राहुल नैताम, अमोल आईंचवार, ॲड. डिंपल उंदिरवाडे, सामाजिक कार्यकर्ते माणिक तुरे आदींच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्याकडे सोपविण्यात आला असून तपासावर वरिष्ठ स्तरावरून बारकाईने देखरेख ठेवण्यात येत आहे.

Don`t copy text!