गडचिरोलीत संविधान सन्मान महोत्सव व परिषद – डॉ. सुरेश माने यांचे मार्गदर्शन

254

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 23:- भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गोंडवाना विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीने संविधान सन्मान महोत्सव आणि संविधान परिषद आयोजित करण्यात आली आहे. दिनांक 25 व 26 मार्च 2025 रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुरेश माने हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
25 मार्च रोजी सकाळी 11 वाजता संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, डॉ. सुरेश माने संविधानाच्या महत्वावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख कार्यकारी पदाधिकारी, नागरीक तसेच संविधान प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष मिलींद बांबोळे यांनी केले आहे.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित हा कार्यक्रम संविधान मूल्यांचा प्रसार करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. या विशेष सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.