जनजातीय महिलांसाठी गांडुळखत प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे पार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :– राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, सेवावर्धिनी आणि नीड संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जनजातीय कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत पलखेडा व कुरखेडा येथे महिलांसाठी गांडुळखत निर्मितीवर आधारित प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात एकूण २० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून १०० तासांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.
प्रशिक्षणादरम्यान गांडुळखताचे जैविक शेतीसाठी असलेले महत्त्व, खत निर्मितीची पद्धत, त्याचे विविध प्रकार तसेच गांडुळखताच्या वापरामुळे होणारा आर्थिक व सामाजिक विकास यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी महिलांना गांडुळखत निर्मितीसाठी आवश्यक साहित्यदेखील संस्थेच्या वतीने मोफत प्रदान करण्यात आले.
या प्रशिक्षणात पूनाजीत कुळमेटे (प्रशिक्षक), कु. पल्लवी नंदगिरीवार (प्रकल्प समन्वयक), भविष्य बारेगामा व आशिष मेतकर (सेवा फेलो) यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांची विशेष उपस्थिती होती.
हा उपक्रम केवळ महिला सबलीकरणासाठीच नव्हे, तर पर्यावरणपूरक शेतीकडे वाटचाल करणाऱ्या आणि कौशल्य विकसित करणाऱ्या ग्रामीण भागातील समाजासाठी एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.










