चार आरोपींना अटक, दोन अल्पवयनाचा समावेश
लोकवृत्त न्यूज
सावली दि. १४ मे :- तालुक्यातील केरोडा (मानकापूर हेटी) येथे एका किरकोळ वादाने उग्र वळण घेतले आणि थेट खूनाच्या थरारक घटनेत रूपांतर झाले. आंबेडकर चौकात मंगळवारी दिनांक १३ मे रोजी रात्री ९.३० वाजता भरचौकात समीर हरीदास खंडारे (३२) या तरुणावर चार जणांनी मिळून धारदार चाकूने सपासप वार करत निर्घृण खून केला. या खळबळजनक प्रकरणात दोन अल्पवयीनांसह चार आरोपींना रातोरात अटक करण्यात आली.
प्राथमिक माहितीनुसार, समीर खंडारे याचा गिरीधर वालदे (५०) व त्याचा मुलगा अभय वालदे (२३) यांच्याशी किरकोळ वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की अभयने आपल्या दोन अल्पवयीन मित्रांना – साहील शेडमाके (१६) व पियुष लाटेलवार (१६) – व्याहाड खुर्द येथून बोलावून घेतले. चौघांनी मिळून समीरवर चाकूने हल्ला करत त्याला नितेश नैताम यांच्या पाणठेल्यासमोर मृत अवस्थेत फेकून दिले.
मृतकाचा रक्तामाखलेला मृतदेह पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. समीरच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी त्वरीत तपासाची चक्रे फिरवत आरोपींच्या मोबाईल लोकेशनवरून सर्वांना अटक केली. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही घटना केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूपूरती मर्यादित नाही, तर ती समाजातील असहिष्णुतेचा आणि बेफाम रागाच्या धोकादायक टप्प्याचा स्पष्ट इशारा आहे. सावली तालुक्यात अशा घटनांनी चिंता वाढवली असून कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #Chandrapurpolice #Maharashtra #murder )














