जुनी गाडी देण्याच्या नावाखाली २५ हजारांची फसवणूक ; युवा सेनेच्या पवन गेडाम यांच्यावर आरोप

226

जुनी गाडी देण्याच्या नावाखाली २५ हजारांची फसवणूक ; युवा सेनेच्या पवन गेडाम यांच्यावर आरोप

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ३ जून :- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष पवन गेडाम यांनी जुनी गाडी घेऊन देतो असे सांगून फोन पे द्वारे २५ हजार रुपये उकळल्याचा गंभीर आरोप उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते ॲड. मिनार खोब्रागडे यांनी केला आहे. गडचिरोली येथे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
खोब्रागडे यांच्या म्हणण्यानुसार, पवन गेडाम यांनी आठ महिन्यांपूर्वी “गाडी मिळवून देतो” असे आमिष दाखवून बुकिंगसाठी अनामत रक्कम म्हणून २५ हजार रुपये घेतले. मात्र, वेळ काढून गाडी मिळण्याबाबत अनेक बहाणे केले गेले. अखेर अनेक वेळा पाठपुरावा करूनही गाडी मिळाली नाही, आणि पैसेही परत मिळाले नाहीत.
खोब्रागडे यांनी सांगितले की, पवन गेडाम यांना वारंवार विचारणा केल्यानंतर त्यांनी उलट “तू माझी बदनामी केलीस, आता तुला पैसे देणार नाही” असे सांगून धमकीच दिली. त्यामुळे आपण पोलिस ठाण्यात फसवणुकीची लिखित तक्रार दाखल केली, मात्र पोलिसांनी ही बाब ‘दिवाणी स्वरूपाची’ असल्याचे सांगून दाद मागण्यासाठी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. यावर खोब्रागडे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तक्रारीत गडचिरोली पोलिस उपनिरीक्षक बंडू मार्बोनवार आणि चौकशी अधिकारी प्रशांत हेडाऊ यांनी ३ एप्रिल रोजी दिलेल्या पत्राद्वारे सदर प्रकरण हे फौजदारी नव्हे तर दिवाणी स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
खोब्रागडे यांनी पुढे सांगितले की, आपले पक्षाचे जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांनाही या प्रकरणाची माहिती दिली होती. मात्र, त्यांच्याकडून देखील कोणतीही मदत मिळाली नाही.
यावेळी त्यांनी आरोप केला की, लाखो रुपयांचे मोबाईल आणि लक्झरी गाड्या वापरणारे पवन गेडाम यांचे आर्थिक स्रोत तपासावेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मी प्रशासनाकडे करत आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @ShivSenaUBT @ शिवसेना (उबाठा) @AUThackeray #Pawan getham)