अल्पवयीन मुलांना दुचाकी देणाऱ्या २४ पालकांवर गुन्हे दाखल ; गडचिरोली पोलिसांची कठोर कारवाई

677

– अपघात टाळण्यासाठी शहरातील पाच ठिकाणी नाकाबंदी; वाहनं जप्त, पुढील कारवाई तीव्र होणार

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ४ जुलै : – शहरात अल्पवयीन मुलांकडून दुचाकी वाहन चालवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत २४ पालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या निर्देशानुसार २९ जून व ३ जुलै रोजी शहरातील पाच ठिकाणी नाकाबंदी मोहिम राबवण्यात आली.
या दरम्यान विनापरवाना दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले गेले. त्यांना वाहन देणाऱ्या २४ पालकांविरुद्ध मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ च्या कलम १९९(ए) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित वाहनं जप्त करण्यात आली आहेत.
या कलमानुसार, अल्पवयीनांकडून वाहन नियमांचं उल्लंघन झाल्यास पालक वा वाहनमालकाला ३ वर्षांपर्यंत कारावास वा ₹२५,००० दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. तसेच संबंधित मुलांवर बाल न्याय अधिनियम २०१५ अंतर्गत बाल न्याय मंडळासमोर सुनावणी होणार आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, “शहरातील वाढते अपघात रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून पालकांनी जबाबदारीने वागावे. मुलांना वाहतूक नियमांची पूर्ण माहिती द्यावी.”
ही मोहिम अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली गोकुळ राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, पोनि. विनोद चव्हाण, सपोनि. शरद मेश्राम व वाहतूक शाखेच्या पथकाने राबवली.
पोलीस अधीक्षकांनी अशा मोहिमा भविष्यात अधिक तीव्रपणे राबवण्याचे संकेत दिले आहेत.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @gadachiroli police #crime #naxal #trafic)