विदर्भात नवसाला पावणारी कावड यात्रा : गडचिरोली ते मार्कंडा पायदळ यात्रेला ५ ऑगस्टला भव्य सुरुवात

366

विदर्भात नवसाला पावणारी कावड यात्रा : गडचिरोली ते मार्कंडा पायदळ यात्रेला ५ ऑगस्टला भव्य सुरुवात

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- श्रावण महिन्याच्या पावन प्रारंभाने संपूर्ण वातावरणात भक्तीमय उत्साह दाटला असून, गडचिरोली जिल्ह्यातील शिवभक्तांसाठी एक अत्यंत भावनिक पर्व ठरलेली गडचिरोली ते मार्कंडा पायदळ कावड यात्रा यंदाही ५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे.
सुंदर कांड भजन मंडळ तथा मित्र परिवार गेल्या सहा वर्षांपासून या यात्रेचे आयोजन अत्यंत भक्तिभावाने करत असून, यावर्षीही मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता दुर्गा माता मंदिर, गडचिरोली येथून यात्रेला शुभारंभ होणार आहे. यात्रेत सहभागी भाविक गडचिरोलीतील पवित्र नदी संगमाचे जल खांद्यावर कावड घेवून ‘विदर्भाची काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्कंडा देवस्थानात पोहोचणार आहेत.
या यात्रेत हजारो शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग दिसतो. पारंपरिक झाक्या, हर हर महादेवच्या घोषात गुंजणारी भजने, सुंदरकांडाचे सामूहिक पठण, आणि संपूर्ण मार्गावर चालणाऱ्या भाविकांची निष्ठा, या सर्व गोष्टींनी वातावरण भक्तिमय होते.
विशेष म्हणजे, “नवसाला पावणारी कावड यात्रा” म्हणून या यात्रेची ओळख निर्माण झाली आहे. अनेक भक्त आपले नवस पूर्ण करण्यासाठी ही यात्रा पायदळ पूर्ण करत असल्याचे दिसते. भाविकांच्या सांगण्यानुसार, या यात्रेनंतर अनेक नवस पूर्ण झाल्याची उदाहरणंही यामागे आहेत.
या यात्रेच्या माध्यमातून केवळ श्रद्धा नव्हे, तर सामाजिक एकात्मतेचाही संदेश दिला जात आहे. धार्मिक परंपरा आणि स्थानिक भावविश्व यांचा सुरेख संगम या यात्रेत दिसून येतो.
५ ऑगस्टला पवित्र कावड जल घेऊन, “हर हर महादेव”च्या जयघोषात गडचिरोली ते मार्कंडा पायदळ यात्रा ही एक भक्तिभावाची दिव्य अनुभूती ठरणार आहे.