आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. 25 ऑगस्ट :- गडचिरोली जिल्ह्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी “Vision Gadchiroli 2025” या उपक्रमाअंतर्गत एक खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. हे चर्चासत्र मंगळवार, दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12.00 ते 2.00 वाजेपर्यंत कर्तव्य सभागृह, कर्तव्य कक्ष क्र. 01, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे होणार आहे.
या चर्चासत्रात रोजगार निर्मिती, कृषी व सिंचन, आरोग्य सेवा, शिक्षण, पर्यटन विकास, औद्योगिक संधी तसेच पायाभूत सुविधा अशा जिल्ह्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.
“पर्यटन जपत आधुनिकतेकडे वाटचाल करूया आणि आपला गडचिरोली प्रगत व समृद्ध बनवूया” या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून, नागरिकांच्या मतांना व सूचनांना यात विशेष महत्त्व दिले जाणार आहे.
या कार्यक्रमात आ. डॉ. मिलिंद नरोटे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यांनी जिल्हावासीयांना आवाहन केले आहे की —
“आपल्या गडचिरोलीच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आपले विचार मांडावेत. नागरिकांच्या सहभागातूनच गडचिरोलीचा शाश्वत विकास साध्य होऊ शकतो.”
जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या चर्चासत्राला यशस्वी करून द्यावे, असे आवाहन आ. डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले आहे.










