लेकुरबोडी जंगल परिसरात माओवादी डाव उधळला ;

1153

पोलिसांची स्फोटक साहित्य केले जप्त

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १७ : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील लेकुरबोडी जंगल परिसरात माओवाद्यांनी घातपाताच्या उद्देशाने लपवून ठेवलेला मोठा स्फोटक साठा गडचिरोली पोलिसांनी विशेष मोहिमेदरम्यान जप्त केला आहे. या कारवाईमुळे संभाव्य मोठा विध्वंसक कट उधळून लावण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार १५ सप्टेंबर रोजी तीन विशेष अभियान पथके व बिडीडीएस पथक लेकुरबोडी परिसरात रवाना झाले होते. दुसऱ्या दिवशी, १६ सप्टेंबर रोजी जंगलात शोधमोहीम सुरू असताना पथकास एक संशयास्पद जागा आढळून आली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तपासणी केली असता तेथे माओवाद्यांनी लपवून ठेवलेला पाच लिटरचा स्टील डब्बा, एक किलो पंचवीस ग्रॅम पांढरी स्फोटक पावडर, दोन किलो पन्नास ग्रॅम धारदार लोखंडी सिलेटर, चार नग क्लेमोर व आठ नग इलेक्ट्रिक वायर बंडल असे स्फोटक साहित्य आढळून आले. पोलिसांनी सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत हा सर्व साठा जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, गोकुल राज जी., सत्य साई कार्तिक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोउपनि. प्रसाद पवार, निखिल धोबे, गणेश वलमर-पाटील यांच्यासह विशेष अभियान पथक व बिडीडीएस जवान सहभागी झाले होते.
या धडाकेबाज मोहिमेबद्दल पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सहभागी अधिकारी व जवानांचे कौतुक केले. तसेच माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले.

#Lokvruttnews #lokvrutt_News @lokvrutt.com
#gadchirolinews #gadchirolipolice #latestnews #kurkhedanews #korchinews #crimenews