– गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : गडचिरोली शहरातील एका कापड दुकानाच्या उंच इमारतीच्या छतावर सोलर सिस्टम लावताना कामगार छतावरून खाली जमिनीवर कोसळल्याची घटना शहरात घडल्याची माहिती समोर येत असून गंभीर जखमी झालेल्या कामगाराला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे कळते. मात्र सदर घटना ही झाकण्याचा प्रकार संबंधित दुकान मालकाकडून केल्या जात असल्याचे बोलले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार गडचिरोली शहरातील एका मोठ्या कापड दुकानाच्या छतावर एका कंपनीला सोलर लावण्याचे काम सोपविण्यात आले होते. सोलर लावत असताना कामगार हा उंच छतावरून खाली जमिनीवर कोसळला. यात तो गंभीर जखमी झाला. मात्र सदर घटना ही झाकण्याचा प्रकार होत असल्याचे निदर्शनास येत असून गडचिरोली शहरातील एकाही रुग्णालयात गंभीर जखमी कामगाराला उपचाराकरिता दाखल केले नसल्याचे आमच्या चौकशीत स्पष्ट झाले असून हा प्रकार झाकण्याचा प्रयत्न होत आहे असे दिसून या. दरम्यान कामगाराची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे कळते, तो कामगार मृत्यूशी झुंज देत असल्याचे समजते त्यामुळे हा प्रकार लपविण्याचा प्रयत्न होत असल्याचे कळते.
बातमी लिहेस्तव जखमी कामगाराचे व दुकानाचे नाव कळू शकले नाही तरी शहरातील कोणत्या दुकानावर सदर काम सुरू होते व जखमी कामगाराचे नाव काय ? याचा शोध आता आमची टीम घेत आहे.













