– सोन्याची चैन हिसकावली
लोकवृत्त न्यूज
देसाईगंज :- गांधीवार्ड परिसरात दारु सेवनाला विरोध केल्याने एका युवकाला तिघा इसमांनी मारहाण करत त्याच्याकडील दोन तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावल्याची धक्कादायक घटना ३ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली असून, देसाईगंज पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येशुदितकुमार चंदू आळे (वय ३३), रा. गांधीवार्ड, देसाईगंज, व्यवसाय – यश कोचिंग अकॅडमी, असे तक्रारदाराचे नाव आहे. ते आपल्या कुटुंबासह देसाईगंज येथे वास्तव्यास असून, वडसा व नागपूर येथे ‘यश कोचिंग अकॅडमी’ चालवतात.
घटनेच्या दिवशी, म्हणजेच ३ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे २.५० वाजताच्या सुमारास आळे हे आपल्या मित्र आदेश राऊतसोबत घरासमोरून जात असताना, मॉन्टी उर्फ मलिंदरसिंग निर्मलसिंग मक्कड (रा. गांधीवार्ड) व त्याचे दोन मित्र – बाबू उर्फ अमित अजय नागदिवे (रा. शिवाजीवार्ड) आणि हितेश उर्फ हरिओम दिवाकर नखाते (रा. गांधीवार्ड) हे तिघे रस्त्यावर दारु पित बसलेले दिसले.
आळे यांनी महिलावर्ग या रस्त्यावरून ये-जा करीत असल्याने तेथे दारु पिऊ नये, असे सांगितल्यावर मॉन्टीने संतापून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्याने आदेश राऊतच्या पोटात लाथ मारत “हा रस्ता तुझ्या बापाचा आहे काय?” अशी उर्मट प्रतिक्रिया दिली. त्यानंतर तिघे तेथून निघून गेले.
मात्र काही वेळाने, दुपारी अंदाजे ३.२० वाजता आळे आणि आदेश राऊत हे गांधीवार्ड येथील हनुमान मंदिराजवळ पोहोचले असता, तेथे पुन्हा मॉन्टी मक्कड आपल्या दोन्ही साथीदारांसह आला. त्याने पुन्हा शिवीगाळ करत “अभी तो तेरे दोस्त को लाथ मारी थी, अब तुझे देख क्या करता हूं” असे म्हणत आळे यांच्यावर हल्ला चढवला. बाबू नागदिवे याने आळे यांची मान मुरडली, तर हितेश नखाते याने “दादा सरच्या गळ्यात सोन्याची चैन आहे, खिंच के निकाल उसकी चैन” असे म्हणत त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची (अंदाजे किंमत १.५० लाख रुपये) सोन्याची चैन हिसकावली.
त्या तिघांनी मिळून आळे व आदेश राऊत यांना हातबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. डोळा, तोंड व पायावर मार लागल्याने आळे जखमी झाले. नागरिकांनी गर्दी केल्याने व पोलिस घटनास्थळी पोहोचल्याने आरोपी तिघे पळून गेले.
यानंतर आळे यांनी पोलीस स्टेशन देसाईगंज येथे उपस्थित राहून दिलेल्या तक्रारीवरून मॉन्टी मक्कड, अमित उर्फ बाबू नागदिवे आणि हितेश उर्फ हरिओम नखाते या तिघांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ, धमकी आणि चोरीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देसाईगंज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
#देसाईगंज #गडचिरोली #मारहाणप्रकरण #दारुसेवनविरोध #CrimeNews #Lokvrutt News @Lokvrutt.com












