गडचिरोलीत राजकीय भूकंप : माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरड्डीवार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

1314

– उद्या विजयभाऊ वडेट्टिवारांच्या उपस्थितीत काँग्रेसचा भव्य पक्षप्रवेश सोहळा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२६ :- जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय भूकंप पहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि गडचिरोली नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरड्डीवार हे उद्या २७ ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या भगव्या-निळ्या मंचावर येणार असून, त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांचा देखील मोठा लोंढा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.
या भव्य प्रवेश सोहळ्याला आमदार विजयभाऊ वडेट्टिवार प्रमुख उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे ठिकाण म्हणजे पोरड्डीवार यांच्या निवासस्थानासमोरील भव्य आवार राजकीय शक्तिप्रदर्शनाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.
सुरेश पोरड्डीवार यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी प्राचार्य कविता सुरेश पोरड्डीवार यांचाही काँग्रेस प्रवेश ठरणार असून, त्या याच मेळाव्यात काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर केल्या जाणार आहेत असे बोलल्या जात आहे.
२०१९ मध्ये थोडक्यात पराभूत झालेल्या कविता पोरड्डीवार आता पंजा चिन्हावर उतरल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य, तर भाजपात खळबळ माजली आहे.
स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा उत्साह उसळला आहे, आणि “गडचिरोलीत पुन्हा पोरड्डीवारांची लाट येतेय!” अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
दुसरीकडे, भाजपच्या गोटात सध्या तणावपूर्ण वातावरण.ल निर्माण झाले असून नगराध्यक्ष पदासाठी गीता हिंगे किंवा योगीता पिंपरे यापैकी एकीचं नाव चर्चेत आहे. मात्र काँग्रेसकडून कविता पोरड्डीवार यांच्या मैदानात उतरल्याने भाजपाला धक्काच बसला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. देवराव होळी आणि डॉ. नामदेव उसेंडी यांच्यात उमेदवार निवडीसंदर्भात खलबते सुरु असून, पक्ष रणनीती आखण्यात व्यस्त आहे.
गडचिरोलीच्या राजकारणात सध्या अस्मिता, सत्ता आणि प्रतिष्ठेची लढत पेटली आहे. २७ ऑक्टोबरचा दिवस निर्णायक ठरणार असून “पोरड्डीवार विरुद्ध भाजप” या थेट मुकाबल्याची घोषणा जणू या मेळाव्यात होणार आहे!