दारुबंदी जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई : अवैध दारूसह 9.86 लाखांचा मुद्देमाल जप्त

303

– दोन आरोपी फरार, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ०२ :- गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतानाही काही व्यक्ती अवैधरीत्या देशी व विदेशी दारूची विक्री व वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मोठी कारवाई करत एका चारचाकी वाहनासह एकूण 9 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अवैध दारू विक्रीविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे आदेश दिलेले असून, त्यानुसार 31 ऑक्टोबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
गोपनीय बातमीदाराकडून प्राप्त माहितीनुसार, जिनेश मेश्राम व आकाश भरडकर (दोघे रा. गोकुलनगर, गडचिरोली) हे महिंद्रा कंपनीच्या चारचाकी वाहन (क्र. MH-46-AL-0027) मधून चातगाव मार्गे अवैध दारूची वाहतूक करणार असल्याचे कळले. त्यावरून पोलिसांनी चातगाव येथील कारवाफा टी-पॉईंटवर सापळा रचला. दरम्यान एक काळ्या तपकिरी रंगाचे वाहन दिसून आल्याने पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला असता, चालकाने वाहन थांबवण्याऐवजी साखेरा–जांभळी रोडकडे पळ काढला. वाहन अडवण्यात आल्यानंतर दोन इसम अंधार व जंगलाचा फायदा घेत फरार झाले. त्यावेळी जिनेश मेश्राम हा पोलिसांच्या नजरेतून पसार झाला.
वाहनाची पंचासमक्ष तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू आढळून आली. त्यात रॉकेट संत्रा देशी दारूच्या 4500 बाटल्या (किंमत 3,60,000), हायवर्ड 5000 बिअरच्या 120 टिन (42,000), बडवायझर मॅग्नम बिअरच्या 96 टिन (33,600), रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्कीच्या 96 निपा (38,400), तसेच वाहतुकीसाठी वापरलेली महिंद्रा कंपनीची चारचाकी वाहन (5,00,000), आणि दोन मोबाईल फोन (12,000) असा एकूण 9,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी चातगाव पोलीस ठाण्यात कलम 65(अ), 83, 98(2) महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास मपोउपनि. आश्विनी पाटील करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनी अरुण फेगडे यांच्या यांनी केली.
गडचिरोली पोलीस दलाकडून अवैध दारूविरोधी अभियान आणखी तीव्र करण्यात येणार असून, जिल्ह्यातील दारुबंदी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे.