पालकमंत्री दोन… पण शेतकऱ्यांच्या बांधावर येईल कोण?

182

तीन दिवसांत शेतकऱ्यांना मदत जाहीर करा, अन्यथा मुंडन आंदोलन करण्याचा काँग्रेसचा इशारा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली (प्रतिनिधी) :- गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, रानटी हत्ती व वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सहपालकमंत्री दोघे असतानाही, अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावर कोणीही पोहोचलेले नाही, अशी तीव्र टीका जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.
जिल्ह्यातील धान, कपाशी आणि सोयाबीन पिके अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचा हंगामी खर्च पिकावरून परत मिळण्याऐवजी कर्जाच्या ओझ्यात वाढ होत आहे. “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गडचिरोलीचे पालकमंत्री असून, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे सहपालकमंत्री आहेत. मात्र, या दोघांपैकी कोणत्याही मंत्र्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली नाही किंवा नुकसानभरपाईबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही,” असे ब्राह्मणवाडे यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे सांगितले की, “पालकमंत्री दोन आहेत, पण शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे दोघांचंही दुर्लक्ष आहे. तीन दिवसांच्या आत जर या दोघांपैकी कुणीही जिल्ह्याचा दौरा करून शेतकऱ्यांची भेट घेतली नाही आणि आर्थिक मदतीचा निर्णय जाहीर केला नाही, तर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेकडो शेतकऱ्यांसह पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन करण्यात येईल.”
अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांवर संकट कोसळले असताना, शेतकऱ्यांच्या या हाकेला शासनाकडून प्रतिसाद मिळतो का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.