-हौशा- गवस्यांचा राजकीय उत्सव
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ४ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच गडचिरोली जिल्ह्यात हौशा-गवस्यांचा आणि स्वयंघोषित कार्यकर्त्यांचा राजकीय उत्सव सुरू झाला आहे. राजकारणाची हौस आणि फायद्याची आस यामुळे ठेकेदार, युवक व तथाकथित कार्यकर्त्यांनी विविध पक्षांच्या दारात गर्दी केली आहे. काहीजण एका पक्षातून दुसऱ्यात उडी मारत आहेत, तर काहीजण नव्याने राजकारणात अवतरले आहेत. या सर्व गडबडीत ठेकेदारांची फौज सर्वाधिक सक्रिय दिसत आहे.
नगर परिषद निवडणुकांचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर होताच काही कार्यकर्त्यांना अचानक राजकारणाची ओढ निर्माण झाली आहे. बिळातून बाहेर पडल्यासारखे हे स्वयंघोषित नेते आता आपल्या मित्रमंडळींसह पक्षप्रवेश सोहळ्यांत सहभागी होत आहेत. पक्षसंघटनादेखील “अमुक कार्यकर्ता आमच्यात सामील” अशा घोषणांनी रंग भरत आहेत.
दरम्यान, या पक्षप्रवेशांमागे खरा हेतू विकासाचा आहे की ठेक्यांचा, हा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. “काम मिळावे म्हणून पक्ष बदलणे” हेच आता नव्या राजकीय समीकरणांचे केंद्रबिंदू बनले आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
काही स्वयंघोषित कार्यकर्त्यांची प्रभागात तिळमात्र ओळख नसतानाही ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. “जनतेसाठी झटायचे की स्वतःसाठी?” – हा प्रश्न आता मतदारांपुढे उभा राहिला आहे.
आता पाहायचे एवढेच की पक्षसंघटना या हौशा-गवस्यांना निष्ठेवर घेतात की नोटेवर, आणि विकासाच्या नावाखाली कोणाचा ‘फायदा’ साधला जाणार हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल.













