गडचिरोली जिल्हा स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी भाजपची जोमात तयारी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ५ नोव्हेंबर :- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी जिल्हा निवडणूक प्रमुख व प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. गडचिरोली जिल्ह्यात माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांची जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून, तर चिमूरचे आमदार बंटी बांगडिया यांची जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपने काही महिन्यांपूर्वी प्रशांत वाघरे यांना जिल्हाध्यक्षपदावरून मुक्त केले होते. मात्र, आता पुन्हा त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांचे पक्षातील महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत वाघरे यांची संघटनात्मक पकड आणि कार्यकर्त्यांशी असलेले थेट संपर्क भाजपसाठी निर्णायक ठरू शकतात, असे मानले जात आहे.
दरम्यान, आमदार बंटी बांगडिया यांच्या नियुक्तीनेही जिल्ह्यातील निवडणूक समीकरणांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी बांगडिया यांनी शिवसेनेच्या नाराज गटाला सोबत घेत ‘युवाशक्ती संघटना’च्या माध्यमातून नगरपरिषद व जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली होती. गडचिरोलीतूनच त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाल्याने त्यांच्या पुनरागमनाकडे स्थानिक राजकारणाचे लक्ष लागले आहे.
या दोन्ही नेत्यांच्या नियुक्तीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका पक्षासाठी प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत.















