गडचिरोली : सलग ५ वर्षांच्या नगराध्यक्षपदावरून थेट नगरसेवकपदाची वेळ

393

 योगिता पिपरे चर्चेत

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : नगरपरिषद निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी अखेर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागे घेतली आहे. २१ नोव्हेंबर रोजी त्यांनी आपला अर्ज परत घेतल्याने शहरातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. आता त्या फक्त प्रभाग क्रमांक ३ मधून नगरसेवक पदाची लढत लढणार आहेत.

योगिता पिपरे या सलग पाच वर्षे नगराध्यक्ष राहिलेल्या अनुभवी आणि भाजपाच्या एकनिष्ठ नेत्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत होते. पक्षाकडून तिकीट जाहीर होण्यापूर्वी शहरभर “पिपरे यांनाच तिकीट मिळणार” अशीच हवा होती. मात्र, ऐनवेळी भाजपाने त्यांचे नाव बाद करत नव्या पक्षप्रवेशितावर विश्वास टाकत उमेदवारी जाहीर केली.

या निर्णयानंतर शहरात ‘पिपरे अपक्ष म्हणून लढतील’ अशी चर्चा रंगली. त्यांनी अपक्ष अर्ज दाखलही केला होता. पण शेवटच्या दिवशी त्यांनी तोही मागे घेतला आणि नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक ३ मधून अर्ज दाखल केला.

समर्थकांमध्ये नाराजीचा सूर – पक्षांतर्गत गटबाजीला खतपाणी?

एकनिष्ठ आणि अनुभवी नेत्या असूनही पक्षाने त्यांना तिकीट न दिल्याने पिपरे गटात नाराजी उसळल्याचे दिसत आहे. सलग पाच वर्षे नगराध्यक्षपदी विराजमान राहिल्यानंतर यंदा थेट नगरसेवकपदासाठी लढावे लागणे हा त्यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
भाजपने नवख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवत पिपरे यांना वगळल्याने शहरात पक्षांतर्गत गटबाजीचे संकेत मिळू लागले आहेत. त्यांच्या समर्थकांमध्ये “एकनिष्ठांना दुय्यम, नवख्यांना प्राधान्य?” असा सवालही उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, पिपरे आगामी निवडणुकीत भाजपच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी कितपत काम करतील? पक्षाची एकजूट टिकेल का? आणि नाराजीचा परिणाम निकालावर होईल का? यावर शहरात चर्चेची जोरदार धग दिसून येत आहे.
गडचिरोली नगरपरिषद निवडणूक त्यामुळे आणखी रंगतदार बनली असून आगामी घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.