– बनावट दारुसह ६.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त
लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर : पाथरी पोलिसांनी अवैध विदेशी दारू तस्करी करणाऱ्या टोळीवर शनिवारी सकाळी धडक कारवाई करून तीन तस्करांना रंगेहात पकडत मोठा मुद्देमाल हस्तगत केला. पोस्टे पाथरीचे ठाणेदार सपोनि नितेश डोर्लीकर यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पाथरी मार्गावर नाकाबंदी केली असता, स्विफ्ट डिझायर (MH40AR6803) आणि सुजुकी अॅक्सेस मोपेड (MH34CP2798) अडवून तपासणी केली.
दरम्यान वाहनांमधून रॉयल स्टॅग कंपनीच्या ३८४ सिलबंद विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपस्थितीत तपासणी केल्यावर सदर दारू बनावट असल्याचे स्पष्ट झाले. दारूसह वाहतूक करणारी कार, मोपेड, तीन मोबाईल असा एकूण ६,७८,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी कृष्णा धर्मा कंजर (19), प्रकाश रमेश भोयर (37) आणि सागर राजेश कंजर (32) जि. चंद्रपूर यांना अटक केली. त्यांच्या विरोधात पाथरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि गोविंद चाटे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नितेश डोर्लीकर व त्यांच्या पथकाने केली.













