गडचिरोलीत अपघातांची मालिका कायम : ट्रॅव्हल्सची दुचाकीला भीषण धडक ;

1057

दोघे गंभीर

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. १६ डिसेंबर :- जिल्ह्यात रस्ते अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसताना, छत्तीसगडहून चंद्रपूरकडे जाणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवार, १६ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. गडचिरोली शहरालगत असलेल्या बोदली गावाजवळ झालेल्या या भीषण अपघातात दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सचा क्रमांक CG 19 F 0226 असून तिने MH 33 AK 0853 क्रमांकाच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात विनोद कोहपरे (वय ३१) व प्रफुल हजारे (वय २१) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दाखल करण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सदर ट्रॅव्हल्स ही दररोज प्रवासी वाहतूक करत असून बोदली गावाजवळ अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रॅव्हल्स ताब्यात घेतली असून अपघाताबाबत पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरू आहे. जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत असून वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.