बोदली येथे तालुका स्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलनाचे उद्घाटन

293

बोदली येथे तालुका स्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलनाचे उद्घाटन

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १६ : जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या बोदली अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बोदली यांच्या मैदानावर तालुका स्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलनाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या संमेलनाचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी ग्रामपंचायत बोदलीचे सरपंच आकाश निकोडे, उपसरपंच सौ. मनीषा कुणघाडकर, पंचायत समिती गडचिरोलीचे गटशिक्षणाधिकारी मा. हेमलता परसा, ग्रामपंचायत अधिकारी कु. दिपा नैताम, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापक आकारे, युवा फ्रेंड्सचे सदस्य, ग्रामसंघ, ग्रामस्थ तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या तालुका स्तरीय क्रीडा व कला संमेलनामध्ये तालुक्यातील सात केंद्रांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून, विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत बोदली यांच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने उमेद योजनेचा माहिती व मार्गदर्शन स्टॉल तसेच आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड काढण्यासाठी विशेष स्टॉल उभारण्यात आला आहे. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी उमेद स्टॉलला भेट देऊन योजनेची माहिती घेतली व उपक्रमाचे कौतुक केले.