जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा एस. लहाडे यांच्या नेतृत्वाखाली लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी

144

ग्रामीण व आदिवासी महिलांसाठी आधुनिक कुटुंब नियोजन सुविधा, २८ महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २७ :- ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना आधुनिक वैद्यकीय सुविधा जिल्हास्तरावरच उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे आयोजित लॅप्रोस्कोपी (दुर्बिणीद्वारे) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा एस. लहाडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडले.

या विशेष शिबिरात ४८ नोंदणीकृत महिलांपैकी २८ महिलांवर लॅप्रोस्कोपी पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमधून आलेल्या महिलांचा या शिबिरात सहभाग होता.

शिबिराचे उद्घाटन डॉ. वर्षा एस. लहाडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ९ वाजता झाले. लॅप्रोस्कोपी ही बिनटाका, अत्याधुनिक शस्त्रक्रिया पद्धत असून यामध्ये रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर कमी वेदना होतात, लवकर बरे होता येते तसेच केवळ दोन दिवसांत रुग्णालयातून सुट्टी मिळते. त्यामुळे ग्रामीण महिलांसाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

या शिबिराच्या नियोजन, अंमलबजावणी व यशस्वी आयोजनात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा एस. लहाडे यांची प्रभावी भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची चमू कार्यरत होती. यामध्ये महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शशिकांत बद्देला, डॉ. हिना उंदीरवाडे, शल्य चिकित्सक डॉ. कृणाल चेंडकापूरे, डॉ. नागसेन साखरे, डॉ. मित्तल गेडाम तसेच भूलतज्ज्ञ डॉ. हेमंतकुमार मडावी यांचा समावेश होता. परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनीही मोलाचे सहकार्य केले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. वर्षा एस. लहाडे म्हणाल्या की, “ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांना दर्जेदार व आधुनिक वैद्यकीय सुविधा जिल्ह्यातच उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. अशा शिबिरांमुळे महिलांना सुरक्षित कुटुंब नियोजनाचा पर्याय मिळत असून, भविष्यातही जिल्हास्तरावर तसेच उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये अशा विशेष शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल.”