– प्रशासनाच्या मौनावर गंभीर प्रश्न, ‘जाऊ तिथे खाऊ’ चित्रपटातील प्रसंग तालुक्यात प्रत्यक्षात
लोकवृत्त न्यूज
कोरची : मध्यंतरी प्रदर्शित झालेल्या ‘जाऊ तिथे खाऊ’ या चित्रपटात शासकीय योजनेतील चक्क विहीरच चोरीला गेल्याचा विनोदी पण बोचरा प्रसंग दाखवण्यात आला होता. मात्र, तोच प्रकार आता गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या कोरची तालुक्यात प्रत्यक्षात घडल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तालुका मुख्यालयापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढरापाणी येथील आदिवासी शेतकरी शंकर मन्हेर मडावी यांच्या नावावर धरती आबा भगवान बिरसा मुंडा शेतकरी जलसिंचन योजना अंतर्गत विहीर मंजूर करण्यात आली. मात्र, विहिरीचे कोणतेही प्रत्यक्ष बांधकाम न करता थेट ३,८२,५६३ रुपये लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
चौकशी पूर्ण, तरीही कारवाई शून्य
प्रकरण उजेडात आल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशीही पार पडली. चौकशी अहवालात लाभार्थ्याच्या शेतात विहिरीचे बांधकाम झालेले नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला असतानाही आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, ही बाब अधिक धक्कादायक ठरत आहे.
पैसे काढण्यासाठी दारात हजेरी?
या प्रकरणातील आणखी गंभीर बाब म्हणजे, लाभार्थ्याच्या खात्यात जमा झालेली रक्कम काढण्यासाठी काही व्यक्ती थेट शेतकऱ्याच्या दारात हजर झाल्याचा आरोप आहे. “एक लाख रुपये देऊ” असे आमिष दाखवण्यात आले; मात्र हे पैसे कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून काढले जात होते, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अदृश्य हात कोणाचे?
चौकशी पूर्ण होऊनही कारवाई का होत नाही? संबंधित अधिकारी अजूनही मोकाट कसे? या प्रकरणामागे नेमके कोणाचे ‘अदृश्य हात’ कार्यरत आहेत?
असे अनेक प्रश्न आता कोरची तालुक्यातील आदिवासी जनतेच्या मनात उभे राहिले आहेत.
एक विहीर नव्हे, अनेक घोटाळ्यांची शक्यता
हे प्रकरण अपवाद नसून, तालुक्यात अशाच स्वरूपाचे इतर प्रकारही घडल्याची जोरदार चर्चा आहे. शासनाच्या नावाखाली आदिवासी शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा लाटणाऱ्यांवर कारवाई कधी? असा संतप्त सवाल जनतेकडून उपस्थित होत आहे.
“माझ्या शेतात आजतागायत विहिरीचे कोणतेही बांधकाम झालेले नाही. मात्र एक दिवस काही लोक माझ्या खात्यातून पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांनी मला एक लाख रुपये देण्याचे सांगितले; पण ते पैसे कशासाठी आहेत, हे कधीच सांगितले नाही.
– शंकर मडावी, आदिवासी शेतकरी, पांढरापाणी
या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच कोरची तालुक्यातील सर्व शासकीय विहीर योजनांचे विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.













