विद्यार्थ्यांचा एल्गार यशस्वी : पोलीस भरतीच्या भविष्यासाठी लॉयड्सची GDPL स्पर्धा अखेर स्थगित
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२ जानेवारी :- जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या एकजुटीच्या आणि तीव्र आंदोलनापुढे अखेर ‘लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’ (LMEL) ला माघार घ्यावी लागली. विद्यार्थ्यांच्या ठाम मागणीनंतर यंदाची गडचिरोली जिल्हा प्रीमियर लीग (GDPL) स्पर्धा अधिकृतपणे स्थगित करण्यात आली असून, हा निर्णय विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा निर्णायक विजय मानला जात आहे.
जिल्हा मुख्यालयातील जिल्हा प्रेक्षसागर मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार होती. मात्र हेच मैदान पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचण्यांच्या सरावासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने, स्पर्धेमुळे उमेदवारांच्या तयारीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.
या पार्श्वभूमीवर हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपली भूमिका ठामपणे मांडली. त्यांनी आमदार डॉ. नरोटे यांच्या कार्यालयात धडक देत स्पर्धा तात्काळ स्थगित करण्याची मागणी रेटून धरली. विद्यार्थ्यांचा वाढता दबाव, संभाव्य सामाजिक असंतोष आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत अखेर लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने GDPL स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये समाधानाची लाट पसरली असून, “विद्यार्थ्यांचे भविष्य प्रथम” हा संदेश ठळकपणे पुढे आला आहे. GDPL स्थगिती ही केवळ एका क्रीडा स्पर्धेचा विषय नसून, संघटित विद्यार्थी शक्तीने लोकशाही मार्गाने मिळवलेल्या विजयाचे ठोस उदाहरण ठरले आहे.














