एटापल्लीतील स्टेट बँकेत दोन वेळा चोरी करण्याचा प्रयत्न ; आरोपी अटकेत

117

एटापल्लीतील स्टेट बँकेत दोन वेळा चोरी करण्याचा प्रयत्न ; आरोपी अटकेत

लोकवृत्त न्यूज
एटापल्ली, दि. ०९ : एटापल्ली येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत दोन वेळा चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस एटापल्ली पोलिसांनी अटक केली आहे. १६ डिसेंबर २०२५ व ०७ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री आरोपीने खिडकीतून प्रवेश करून लॉकर व एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो अपयशी ठरला.
या प्रकरणी पोलीस स्टेशन एटापल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे बिभास ऊर्फ संजु बच्चु डे (वय २३, रा. पाखांजूर, जि. कांकेर, छ.ग.) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्या अटकेमुळे दोन्ही चोरीचे प्रयत्न उघडकीस आले आहेत.
आरोपीस न्यायालयात हजर केले असता १२ जानेवारी २०२६ पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिणी गिरवलकर करीत आहेत.