९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात गडचिरोलीच्या गजानन गेडाम यांचा सन्मान
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : सातारा येथे १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात गडचिरोली येथील समाजसेवक व कवी गजानन भिकाजी गेडाम यांचा गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला. कवी कट्टा या मान्यवर मंचावर त्यांच्या बोलीभाषेतील “मायबापाची सर” या कवितेची निवड होऊन सादरीकरणाची संधी मिळाल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रातील योगदान अधोरेखित झाले.
या भव्य साहित्य संमेलनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वअजितदादा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मराठी भाषा संचालक तसेच राज्यातील अनेक मान्यवर नेते, साहित्यिक व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखिल भारतीय साहित्य संमेलनात नाटक, गझल, कविता, चर्चासत्रे, मुलाखती आदी विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कवी कट्टा या मंचासाठी देशभरातून तब्बल १७५० कविता प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ४५० कवितांची निवड करण्यात आली. या निवडीत गडचिरोलीच्या गजानन गेडाम यांची “मायबापाची सर” ही कविता समाविष्ट होऊन ३ जानेवारी २०२६ रोजी सातारा येथे सादर करण्यात आली.
या कवितेचे सादरीकरण झाल्यानंतर कविसंमेलनाचे अध्यक्ष यांनी कवितेतील आशय अतिशय मार्मिक, हृदयस्पर्शी व मन खेचक असल्याचे सांगत विशेष कौतुक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गजानन गेडाम यांचा सन्मान करण्यात आला.
या सन्मानामुळे गडचिरोली जिल्ह्यातील साहित्यिक व कवींसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











