गोंडवाना विद्यापीठात उद्या दीक्षांत सोहळा

147

गोंडवाना विद्यापीठात उद्या दीक्षांत सोहळा; ९६ जणांना आचार्य पदवी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २० : गोंडवाना विद्यापीठाचा तेरावा दीक्षांत समारंभ उद्या बुधवार, २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता गोंडवाना विद्यापीठाच्या नव्या सांस्कृतिक सभागृहात संपन्न होणार आहे. या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे हे असणार असून, सर्च (SEARCH), चातगाव, गडचिरोलीचे संस्थापक डॉ. अभय बंग हे प्रमुख पाहुणे म्हणून दीक्षांत भाषण करणार आहेत. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या समारंभास अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद यांचे सन्माननीय सदस्य, दानदाते तसेच विद्यापीठातील विविध प्राधिकरणे, मंडळे व समित्यांचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. यावेळी विशेष गुणवत्ता व प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण व रजत पदके, तसेच आचार्य (पीएच.डी.), पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
यंदा विद्याशाखानिहाय एकूण ९६ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात येणार असून, मानव विज्ञान विद्याशाखेतील ४३, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील ३४, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील १५ आणि आंतरविद्याशाखीय विद्याशाखेतील ४ विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे.
सुवर्णपदकांमध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील नेवाजाबाई हितकरणी महाविद्यालय, ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) येथील वैष्णवी संजय थेरकर हिने तीन सुवर्णपदके मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील राष्ट्रपिता महात्मा गांधी आर्ट अँड सायन्स कॉलेज, नागभीड (जि. चंद्रपूर) येथील जादा रबिया रियाज हिनेही तीन सुवर्णपदके मिळवली आहेत.
विद्याशाखानिहाय सुवर्णपदकांची संख्या मानव विज्ञान – २३, विज्ञान व तंत्रज्ञान – ८, वाणिज्य व व्यवस्थापन – ५ आणि आंतरविद्याशाखीय – ३ अशी असून, या दीक्षांत समारंभात एकूण ३९ सुवर्ण व १ रजत अशी ४० पदके प्रदान केली जाणार आहेत. यासोबतच स्पार्क (SPARC – Social Programme on Addiction in Rural Community) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदविकाही प्रदान करण्यात येणार आहे.
या दीक्षांत समारंभाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी केले आहे.
#lokvrutt #lokvruttnews #gadchirolinews #gadchirolipolice #gondwanauniversity #GondwanaUniversity #Convocation2026 #13thConvocation#Gadchiroli#HigherEducation
#AcademicExcellence #UniversityNews
#DegreeDistribution#GoldMedalists#PhDConvocation#EducationNews #MaharashtraEducation #StudentAchievement