हिरापूर टोलनाक्याजवळ ट्रॅव्हल्स पलटली : भीषण अपघातात अनेक प्रवासी जखमी

313

हिरापूर टोलनाक्याजवळ ट्रॅव्हल्स पलटली : भीषण अपघातात अनेक प्रवासी जखमी

लोकवृत्त न्यूज
सावली : सावली तालुक्यातील हिरापूर व चकपिरंजी दरम्यान असलेल्या टोलनाक्याजवळ चंद्रपूरहून गडचिरोलीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा आज २४ जानेवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी तब्बल ४१ प्रवासी गंभीर जखमी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
चंद्रपूरवरून येणारी एच.के.जी.एन. ट्रॅव्हल्स (क्रमांक MH-04-GP-1736) ही बस सावलीमार्गे गडचिरोलीकडे जात असताना अचानक समोर दुचाकी आल्याने चालकाचा ताबा सुटला. यामुळे ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघातावेळी बसमध्ये सुमारे ५५ प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती आहे.
अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरड सुरू झाली. जखमींपैकी २९ प्रवाशांना सावली ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गडचिरोली व चंद्रपूर व नागपुर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अनेक प्रवाशांचे हात-पाय फ्रॅक्चर झाले असून काहींना गंभीर अंतर्गत दुखापती झाल्या आहेत.
या अपघातामुळे सावली तालुक्यातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात मानला जात असून, मोठा अनर्थ थोडक्यात टळल्याची भावना व्यक्त होत आहे. मृत्यू डोळ्यांसमोरून निसटल्याने अनेक प्रवाशांनी भीती आणि संताप व्यक्त केला. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च संबंधित प्रवासी वाहतूक कंपनीने उचलावा, अशी जोरदार मागणी प्रवाशांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस ठाण्याचे ठाणेदार पुलरवार व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे.