Home Breaking News अहेरीत माजी जि. प. अध्यक्ष कंकडालवारांच्या बेकायदेशीर इमारतीवर बुलडोझर

अहेरीत माजी जि. प. अध्यक्ष कंकडालवारांच्या बेकायदेशीर इमारतीवर बुलडोझर

1410

चार मजली इमारत जमीनदोस्त करण्यास सुरुवात

लोकवृत्त न्यूज
अहेरी. :– कायदा सर्वांसाठी समान आहे, हे पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाले आहे. अहेरी शहरातील राज्य महामार्गालगत उभारण्यात आलेली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची बहुचर्चित बेकायदेशीर चार मजली इमारत अखेर नगर पंचायत प्रशासनाने बुलडोझर चालवत जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयाने तात्पुरता मनाई हुकूम नाकारल्यानंतर आणि दिलेली अंतिम मुदत संपल्यानंतर ही निर्णायक कारवाई करण्यात आली.
कंकडालवार यांनी कोणतीही अधिकृत बांधकाम परवानगी न घेता, नगररचना व नियमांना हरताळ फासून ही भव्य इमारत उभारल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला होता. लोकप्रतिनिधी असताना कायद्याचे पालन करण्याची अपेक्षा असतानाच, स्वतःच नियमांचे उल्लंघन केल्याने या प्रकरणाची तीव्रता अधिक वाढली होती. अखेर न्यायालयाच्या निर्देशानुसार नगर पंचायत प्रशासनाने जड यंत्रसामग्रीच्या सहाय्याने संपूर्ण इमारत पाडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
ही कारवाई सुरू होताच अहेरी शहरात खळबळ उडाली. माजी जि. प. अध्यक्षावर थेट कारवाई होत असल्याने नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली होती. संभाव्य तणाव लक्षात घेता पोलीस प्रशासन, दंगल नियंत्रण पथक आणि अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच अहेरी–देवलमरी मुख्य मार्ग कारवाईच्या कालावधीत पूर्णतः बंद ठेवण्यात आला.
नगर पंचायत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, बेकायदेशीर बांधकामांविरोधात प्रशासनाची शून्य सहनशीलतेची भूमिका असून, पद, सत्ता किंवा राजकीय प्रभाव कोणालाही वाचवू शकत नाही. सार्वजनिक सुरक्षेला आणि शहर नियोजनाला धोका ठरणाऱ्या बांधकामांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या बेकायदेशीर इमारतीवर झालेल्या या बुलडोझर कारवाईमुळे जिल्हाभरात एकच चर्चा सुरू असून, ‘प्रभावशाली असलात तरी कायद्यापेक्षा मोठे नाही’ हा स्पष्ट संदेश या कारवाईतून गेला आहे.

Don`t copy text!