गडचिरोली : २५ लाखांचा इनामी प्रभाकरसह ७ जहाल माओवादी ठार

452

नक्षली साहित्य व शस्त्रसाठा जप्त

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.६ :- अबुजमाडच्या दुर्गम जंगलात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या नक्षलविरोधी अभियानात गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले असून, सीपीआय (माओवादी) संघटनेचा गडचिरोली विभागीय कमिटी प्रभारी, वेस्ट सब-झोनल ब्युरो प्रभारी तसेच कंपनी क्रमांक १० चा प्रभारी प्रभाकर (रा. कामारेड्डी, तेलंगणा) याच्यासह एकूण ७ जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. ठार झालेल्या प्रभाकरवर २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.
काल रात्री उशिरापर्यंत चकमकीच्या घटनास्थळावरून ३ माओवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले होते. त्यानंतर आज दिवसभर सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान आणखी ४ माओवाद्यांचे मृतदेह (२ पुरुष व २ महिला) पोलिसांच्या हाती लागले. अभियानाच्या अखेरीस एकूण ७ माओवाद्यांचे मृतदेह (४ पुरुष व ३ महिला) हस्तगत करण्यात आले आहेत. यासोबतच घटनास्थळावरून ३ AK-47, १ SLR आणि १ .303 रायफल अशी ५ घातक अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. उर्वरित मृत माओवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या चकमकीत सी-६० पथकातील जवान दीपक चिन्ना मडावी (वय ३८), रा. अहेरी, मूळ रा. मांड्रा, दामरांचा, ता. अहेरी यांनी अतुलनीय शौर्य दाखवत २ माओवाद्यांना ठार केले. मात्र, चकमकीदरम्यान त्यांना गोळी लागून गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे उपजिल्हा रुग्णालय, भामरागड येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांनी वीरगती पत्करली. उद्या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
या अभियानात आणखी एक जवान जोगा मडावी (रा. किष्ट्यापल्ली) यांनाही गोळी लागून दुखापत झाली होती. त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने तातडीने गडचिरोली येथे हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते सध्या धोक्याबाहेर असून लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
मृत माओवाद्यांची सविस्तर ओळख, जप्त साहित्य तसेच अभियानासंदर्भातील अधिकृत तपशील उद्या गडचिरोली पोलीसांकडून आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

#gadchirolinews #gadchirolipolice #Abujhmad Encounter #PoliceNaxalEncounter #C60Commando #MartyrJawan #NaxalitesKilled #Gadchiroli #AntiNaxalOperation #Bravehearts #InternalSecurity #lokvruttnews @lokvrutt.com