– अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू
लोकवृत्त न्यूज
ता. प्र / धानोरा, दि. ०८ : तालुक्यातील मोहली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मोहली–महावाडा मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका नीलगाईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. ५) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मोहली गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या महावाडा क्रमांक २ रस्त्यावर सकाळच्या सुमारास ही घटना घडली. रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने नीलगाईला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की नीलगाईचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मोहलीचे क्षेत्र सहाय्यक डी. डी. दहीकर यांनी वनकर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन नंदनवार यांनी नीलगाईची तपासणी करून तिला मृत घोषित केले. मृत नीलगाईचे वय अंदाजे एक वर्ष असल्याचे निष्पन्न झाले.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी रितसर मोका पंचनामा करून शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर सिंसुर कम्पार्टमेंट क्रमांक ६२० येथे वनविभागाच्या नियमानुसार मृत नीलगाईवर अग्निसंस्कार करण्यात आले.

यावेळी क्षेत्र सहाय्यक डी. डी. दहीकर यांच्यासह वनरक्षक पी. के. उसेंडी, इंदुबाई भेंडेकर, नीता चंदावर तसेच इतर वनकर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या अज्ञात वाहन चालकाचा शोध वनविभागामार्फत सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे.











