– एक गंभीर जखमी
लोकवृत्त आहे
ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथे आज सकाळी भीषण अपघात घडला. मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालवणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर-ट्रॉली थेट गोसेखुर्द कालवा मध्ये पलटी झाली. या अपघातात ५५ वर्षीय शेतकरी विश्वनाथ भिवनकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ भिवनकर हे आपल्या शेतातील तुरीच्या पेंढ्या आणण्यासाठी ट्रॅक्टरने गेले होते. परतीच्या प्रवासात नहराच्या पाळीवर चालक दिपक आलाम (वय ४०) याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असून, त्याच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या अपघातात गिरधर कन्नाके (वय ४०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गांगलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन चे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी चव्हाण करीत आहेत.
दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून निष्पाप शेतकऱ्याचा बळी घेणाऱ्या चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे. या घटनेमुळे तळोधी खुर्द परिसरात शोककळा पसरली आहे.














