पोलिसांचा बोगस दरारा दाखवत खंडणी उकळणारा गडचिरोलीत जेरबंद

1022

पोलिसांचा बोगस दरारा दाखवत खंडणी उकळणारा गडचिरोलीत जेरबंद

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली/चामोर्शी : स्वतःला वरिष्ठ पोलिस निरीक्षक असल्याचे भासवून नागरिकांना अटक करण्याची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या तोतया अधिकाऱ्याचा अखेर पर्दाफाश झाला आहे. अहिल्यानगर सायबर पोलिस स्टेशनच्या पथकाने नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात धडक कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या असून या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
चंदन दिगूराम सांगळे (३०, रा. आष्टी, ता. चामोर्शी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो बीई (अभियांत्रिकी) पदवीधर आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या या युवकाने आपल्या तांत्रिक ज्ञानाचा गैरवापर करत इंटरनेटच्या माध्यमातून विविध हॉटेल चालक, लॉज मालक व व्यावसायिकांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांना लक्ष्य केले. अहिल्यानगरातील एका व्यावसायिकाला फोन करून “वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल पाटील बोलत आहे” अशी बतावणी करत त्याने तुमच्याविरुद्ध गंभीर तक्रार आली असून तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला अटक टाळायची असेल तर ५ लाख रुपये द्या, अशी उघड धमकी दिली. घाबरलेल्या फिर्यादीने तक्रार दाखल केल्यानंतर सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कॉल डिटेल्स, आयपी लॉग्स आणि डिजिटल विश्लेषणाच्या आधारे आरोपीचे लोकेशन गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी परिसरात असल्याचे निश्चित केले. पोलिस निरीक्षक सागर ढिकले यांच्या नेतृत्वाखाली पथक तत्काळ गडचिरोलीत दाखल झाले. पोलिस येत असल्याची खबर लागताच आरोपीने दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र दुर्गम व नक्षलग्रस्त परिसरातही पोलिसांनी आष्टी पोलिसांच्या मदतीने पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान आरोपीकडील मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून त्यातून आणखी माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
तपासात आरोपीविरुद्ध रत्नागिरी जिल्हा आणि गोंदिया जिल्हा येथे यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. पोलिसांच्या नावाचा धाक दाखवून सामान्य नागरिकांना लुटणाऱ्या या तोतया अधिकाऱ्याला अखेर कायद्यानेच चपराक दिली आहे.