अवैध सागवान-बिजा चिरान प्रकरण : आरोपींना 10 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
लोकवृत्त न्यूज
धानोरा, ता. प्र. :- धानोरा तालुक्यातील सामूहिक वनहक्क प्राप्त मेंढा गावालगत जंगलातून अवैधरित्या सागवान व बिजा लाकडाची कटाई व चिरान करताना तिघा आरोपींना वनविभागाने २७ल६ मार्च रोजी अटक केली . याप्रकरणी न्यायालयाने त्यांना 10 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
चिन्नु रैनु दुगा, कालीदास बिहु आतला आणि संतोष देवराव तोफा (सर्व रा. मेंढा, ता. धानोरा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रारंभी 30 मार्चपर्यंत वनकोठडी देण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली.
वनरक्षक एच. के. मडावी व क्षेत्र सहाय्यक ए. के. गांगरेड्डीवार हे नियमित गस्तीवर असताना संतोष तोफा यांच्या शेतात सागवान व बिजा या मौल्यवान इमारती लाकडाचे अवैध चिरान सुरू असल्याचे आढळून आले. यानंतर तत्काळ कारवाई करत भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा नोंदवून 28 मार्च रोजी आरोपींना अटक करण्यात आली.
कारवाईदरम्यान 19 सागवान व 2 बिजाचे नग, असे एकूण 21 नग लाकूड जप्त करण्यात आले. हे लाकूड सामूहिक वनहक्क प्राप्त गावालगतच्या जंगलातून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात इतर काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई उपवनसंरक्षक आर्या व्ही. एस. व सहाय्यक वनसंरक्षक अंबरलाल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण धानोरा वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित डी. पुरमशेट्टिवार व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी केली.
दरम्यान, वनविभागाने नागरिकांना आवाहन केले असून अवैध वृक्षतोडीपासून दूर राहावे तसेच अशा प्रकारांची माहिती तात्काळ वनविभागास कळवावी, असे सांगण्यात आले आहे.











