Home Breaking News ओव्हरटेकच्या नादात भीषण अपघात ; लोहखनिज ट्रकची कारला धडक, कुटुंबीय बचावले

ओव्हरटेकच्या नादात भीषण अपघात ; लोहखनिज ट्रकची कारला धडक, कुटुंबीय बचावले

416

ओव्हरटेकच्या नादात भीषण अपघात ; लोहखनिज ट्रकची कारला धडक, कुटुंबीय बचावले

लोकवृत्त न्यूज
चामोर्शी (दि. १७ एप्रिल) : ओव्हरटेक करण्याच्या नादात सुरजागड येथून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना चामोर्शी येथील लक्ष्मी गेटजवळ शुक्रवारी सकाळी सुमारे ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात कारच्या उजव्या बाजूचा भाग अक्षरशः चक्काचूर झाला; मात्र सुदैवाने कारमधील कुटुंबीय थोडक्यात बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, रूपेश लाड हे पत्नी श्रुतिका (वय ३५), मुलगी वेदश्री (६) व लावण्य (१) यांच्यासह (एमएच १४ जीव्ही-८९९८) क्रमांकाच्या कारने गडचिरोलीकडे जात होते. दरम्यान, मागून वेगाने येणाऱ्या (सीजी ०४ पीटी-१६५१) क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा उजवा भाग पूर्णपणे नुकसानग्रस्त झाला.

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. संतप्त नागरिकांनी तत्काळ रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत वाहतूक रोखली. त्यामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नंतर स्थानिक प्रशासन व पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात धावणाऱ्या मालवाहू वाहनांच्या बेफाम वेगावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा अपघातांना आळा घालण्यासाठी कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Don`t copy text!