शाळा व्यवस्थापन समिती देलनवाडीच्या वतीने फुलोरा उपक्रमाचा गौरव

364

शाळा व्यवस्थापन समितीच्या सन्मानाने मुख्य कार्यकारी अधिकारी भारावले 

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 24 ऑगस्ट: अति दुर्गम नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर वाढवण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रेरणेतून फुलोरा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या शैक्षणिक परिवर्तनाने आनंदी झालेल्या आरमोरी तालुक्यातील देलनवाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आशीर्वाद यांचा दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. फुलोरा उपक्रमाचा जिल्ह्यातील पालकांकडून होणाऱ्या गौरवाने मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदित झाले.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून फुलोरा उपक्रम सुरू असून या उपक्रमामध्ये मुलांना हसत खेळत माध्यमातून शिक्षण देण्यात येत आहे. हा उपक्रम गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास 1 हजार शाळांमध्ये सुरू आहे. या उपक्रमामध्ये मुलांची बोलीभाषा न नाकारता त्यांना प्रमाणभाषेकडे नेण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या कृती केल्या जातात. सोबतच मुलांना प्राथमिक शिक्षणाबरोबरच बालशिक्षण दिल्या जाते. या नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धतीचा गौरव करण्यासाठी देलनवाडी येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कुमार आशीर्वाद यांची भेट देऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. सोबतच त्यांनी गावातील शिक्षण व्यवस्थेची माहिती घेऊन शाळेला प्रातिनिधिक भेट देण्याची ग्वाही दिली. यावेळी कबिरदास कुंभलवार, प्रदीप घरत, गेमराज गेडाम, सूनिल करंडे, मंगल साखरे, वाल्मिक नन्नावरे उपस्थित होते.