घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयाला मिळणार नवी इमारत

0
625

अखेर वनविभागाकडून प्राप्त झाली नवोदय ला बांधकाम करण्यास NOC

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली १४ ऑक्टोबर:- मागील 36 वर्षांपासून घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयातील वन जमिनीचा मुद्दा खितपत पडला होता.वन कायद्याच्या जाचक अटींमुळे केंद्र सरकारकडून कोट्यवधींची बांधकामे मंजूर असून देखील वन विभागाने जमीन हस्तांतरण थांबवून ठेवल्याने तेथे शिकणाऱ्या 500 विद्यार्थ्यांची खूप अडचण वाढली होती. शासनाच्या धोरणानुसार नवोदय साठी लागणारी 12 हेक्टर जमीन राज्य शासनाने उपलब्ध करून द्यायची व त्यांनंतरचा संपूर्ण खर्च केंद्र शासन करणार. त्याला अनुसरून वन विभागाने 28 मे 2008 ला नवोदय प्रशासनाला पत्र देऊन जमिनीचा मोबदला म्हणून 1 कोटी 33 लाख 79 हजार 664 रुपयांची मागणी केली. नवोदय प्रशासनाने राज्य शासनाकडून मागणी करून सदरची संपूर्ण रक्कम 3 ऑगस्ट 2011 रोजी वनविभागाकडे भरणा केली. सतत पाठपुरावा करून देखील वनविभागाने जमीन हस्तांतरण करून दिले नाही आणि परत 2 डिसेंम्बर 2021 ला वाढीव 2 कोटी 53 लाख 4 हजार 395 रुपयांची पत्र देऊन मागणी केली. पुन्हा नवोदय प्रशासनाने राज्य शासनाकडून सदरची संपूर्ण रक्कम मागणी करून दिनांक 7 जानेवारी 2022 व दिनांक 20 मे 2022 ला वनविभागाकडे dd द्वारे सुपूर्द केली. असे असूनदेखील वनविभागाने NOC देण्यास टाळाटाळ केली.मात्र जवाहर नवोदय विद्यालयाच्या पालकांच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर येथे जाऊन वन मंत्री नामदार सुधिर भाऊ मुनगंटीवार यांची भेट घेऊन सदर प्रकरणात लक्ष घालण्याची विंनती केली.लगेचच सुधीर भाऊंनी मुंबई मंत्रालयात फोन लावून हातोहात NOC मिळवून दिली. यामुळे मागील 36 वर्षांपासून रखडलेला वनजमिनीचा प्रश्न सुटल्या मुळे नवोदय समिती कडून टप्पा 2 व टप्पा 3 चे जवळपास 80 कोटी रुपयांचे काम सुरू करण्यास हिरवा कंदील मिळाला आहे.या संपूर्ण कार्यवाही साठी जिल्हाधिकारी संजय मीना साहेबांनी विशेष प्रयत्न केले. सोबतच मा खासदार अशोक नेते, आमदार डॉ देवराव होळी, सुधिर भाऊंचे स्वीय सहाय्यक संतोष अतकारे, अमोल भाऊ आईचंवार, प्राचार्य एम एन राव,उप प्राचार्य राजन गजभिये, राहुल मेश्राम इत्यादींनी सहकार्य केल्याबद्दल पालकांनी सर्वांचे आभार मानले आहेत.जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी देखील या मुद्याला सतत वाचा फोडण्याचे काम केल्याने पत्रकार बांधवांचे देखील पालकांनी आभार मानले आहेत.पालकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ओमप्रकाश साखरे, राकेश शर्मा,सोहन माहोरकर वासुदेव दुधबावरे, अतुल केशवार, धनराज किरमे इत्यादींनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here