अहेरी : कार्यक्रमात मार्गदर्शन करताना माजी आमदार दीपक आत्राम
लोकवृत्त न्यूज
अहेरी ३१ मे :- आपल्या देशातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक स्थितीबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सखोल चिंतन केले होते. त्यांनी आपल्या विचारातून वेळोवेळी देशाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला.आज देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची गरज आहे. त्यांचे विचारच या देशाला तारू शकतात, असे प्रतिपादन माजी आमदार दीपक आत्राम यांनी केले.
तेलंगणा राज्यातील शिरपूर विधानसभा क्षेत्रातील सोमनी येथे नुकताच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तेलंगण प्रदेशातील शिरपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कोनेरू कोनप्पा यांच्या हस्ते करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी बौद्ध भिख्खू बुद्धचरण, भन्ते धम्मविजय, भिख्खुणी खेमा थेरी, भिख्खुनी सुबोधी माता यांची विषेश उपस्थिती होती. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार कोनेरू कोनप्पा म्हणाले की, देशाला एकसंध ठेवायचे असेल व विकासाचे मार्गावर न्यायचे असेल तर राज्यकर्त्यांनी संविधानाची प्रभावी अंमलबजावणी करायला हवी. देश आपोआप विकासाच्या मार्गावर येईल. भारतीय संविधान आपल्या देशाचा आत्मा आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांना समान न्याय व हक्क संविधानाने दिले आहेत. सर्वांना एकसंघ ठेवण्याचे सामर्थ्य केवळ संविधानातच आहे. म्हणून संविधान रक्षणाची जबाबदारी आम्हा सर्वाची आहे, असेही ते म्हणाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर डोंगरे, पुष्पलता पंधराम, पंचायत समिती सदस्य विश्वनाथ भसारकर, सरपंच शारदा वेलादी, बीआरएस पक्षाचे तालुकाध्यक्ष सखाराम सिडाम यांच्यासह परिसरातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.


