हत्याऱ्यांना तत्काळ फाशीची शिक्षा द्या, न्याय न मिळाल्यास आंदोलन करणार

371

लोकवृत्त न्यूज
अहेरी, ६ जून :- नांदेड शहरालगतच्या बोंडार या गावी १ जून रोजी अक्षय भालेराव या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणीसह अन्य बारा मागण्यांचे निवेदन समता सैनिक दल शाखा अहेरी व सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवार (ता. ५) अहेरीचे अपर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपाल, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, आयुक्त अनुसूचित जाती-जमाती आयोग व जिल्हाधिकारी नांदेड यांना पाठविण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, एप्रिल महिन्यात भीमजयंती व भीमरॅली काढली म्हणून तो राग मनात ठेवून १ जून रोजी काही समाजकंटकांनी अक्षय भालेराव या युवकाची निर्घृणपणे हत्या केली. हत्यारे एवढ्यावरच न थांबता अक्षयच्या आईला व भावाला प्राणघातक हल्ला करून वस्तीत धुडगूस घालून दहशत पसरविली. ही राज्याची प्रतिमा कलंकित करण्यासह मानव जातीला काळीमा फासणारी घटना असून हत्याऱ्यांना तत्काळ जेरबंद करून जाहीर फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी निवेदनातून केले आहे. तसेच हत्याऱ्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी, दोषारोपपत्र तत्काळ न्यायालयात दाखल करण्यात यावे, प्रकरण जलद गती न्यायालयात चालविण्यात यावे, कुटुंबाला आर्थिक मदत करून घरातील सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, पीडित कुटुंबीयांच्या जीविताला धोका असल्याने पोलिस संरक्षण देण्यात यावे, गावात पोलिस चौकी उभारण्यात यावी, आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्यास कठोर कारवाई करावी,यासह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. हत्याऱ्यांना फाशीची शिक्षा व दोषींना कठोर शिक्षा होऊन भालेराव परिवाराला तत्काळ योग्य न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना अ‍ॅड. पंकज दहागावकर, सुरेंद्र अलोणे, धर्मपाल डूरक़े, प्रणय अलोणे, नभित ढोलगे, राहुल गर्गम, प्रिया दुर्गे, सारिका ओंडरे, विनीत गोवर्धन, आकांक्षा दहागावकर, जागृती चालूरकर, दीक्षा कुंभारे, प्रकर्षा गव्हारे आदी व असंख्य युवक-युवती उपस्थित होते.