माडेतुकुम येथे विविध विषयांवर कविसंमेलन

399

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ७ जून : आजच्या समाजाचे प्रतिबिंब, झाडीबोलीची महती, प्रेमातील हुरहूर, नेत्यांचे दुर्मिळ दर्शन,अशा विविध विषयांना स्पर्श करणारे कविसंमेलन माडेतुकुम येथे नुकतेच पार पडले.
कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील लेखिका दीप्ती हस्ते होत्या. गावपातळीवरसुद्धा झाडीबोली साहित्य मंडळ चांगले कार्य करत असल्याबद्दल त्यांनी मंडळाची स्तुती करतानाच उपस्थित कवींनी सादर केलेल्या कविता दर्जेदार असल्याचे मत व्यक्त केले. कविसंमेलनात डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांनी झाडीबोलीची महती सांगणारी ‘लाडाची झाडी’ व ‘मित्र’ ही गझल, डॉ. प्रवीण किलनाके यांनी ‘सवत बायकोची’ ही हास्य कविता व ‘गुरुजी’ ही रचना सादर केली. तर संजीव बोरकर यांनी ‘बेकार जमाना आला’ ही झाडीबोलीतील रचना व ‘तेच होते’ ही गझल, तसेच युवा कवी गजानन गेडाम यांनी ‘आठवणींचा पारिजात’ ही रचना, कार्यक्रमाचे आयोजक खेमराज हस्ते यांनी ‘परिवर्तन व वाङ्मय’ ही रचना, गोगावचे कवी बावणे यांनी तूच गजानना, झाडीबोलीतील ‘मन’ ही रचना, शेवटी देवेंद्र मुनघाटे यांनी ‘मनुष्य जीवन जगत असताना’ व ‘पुढाऱ्या येशील कधी परतून’ ही विडंबन रचना सादर केली. संचालन संजीव बोरकर यांनी केले, तर आभार हेमराज हस्ते यांनी मानले.