लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, १२ जून : काव्यप्रकारातील अतिशय रंजक, रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा पण वृत्त, मात्रांचे गणित मांडत लिहिणाऱ्यांची अग्नीपरीक्षा घेणारा काव्य प्रकार म्हणजे गझल. या गझलेचा आविष्कार सहज करता यावा आणि त्यातील तंत्र इच्छुकांना कळावे, यासाठी रविवार (ता. ११) एकदिवसीय गझल कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने स्थानिक शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पत्रकार तथा गझलकार मिलिंद उमरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष तथा साहित्यिक अरुण झगडकर, मार्गदर्शक गझलकार दिलीप पाटील, मार्गदर्शक गझलकार प्रशांत भंडारे, झाडीबोली मंडळाचे गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत लेनगुरे, नाटककार चुडाराम बल्लारपुरे आदी उपस्थित होते. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात साहित्य निर्मितीची आवड निर्माण व्हावी, नवीन साहित्यिक निर्माण व्हावे, त्यांना व्यासपीठ, मार्गदर्शन मिळावे, यासाठी झाडीबोली साहित्य मंडळाचे नेहमीच विविध उपक्रम सुरू असतात. हे त्यांचे कार्य जिल्ह्यासाठी भूषण तसेच प्रसशंनीय आहे. असे प्रतिपादन मिलिंद उमरे यांनी केले. याप्रसंगी कविसंमेलनही घेण्यात आले. यात जितेंद्र रायपुरे, मारोती आरेवार, मिलिंद खोब्रागडे, प्रगती चहांदे, अपर्णा नैताम, प्रतीक्षा कोडापे, मालती सेमले, आनंद बावणे, सुनील उराडे, डॉ. देवेद्र मुनघाटे, प्रकाश मशाखेत्री, उपेंद्र रोहणकर आदी कवींनी विविध विषयांवर आशयघन रचना सादर केल्या. या कार्यशाळेत खेमदेव हस्ते यांच्या आनंदी या कांदबरीचे प्रकाशन केले. मंडळाच्या वतीने लेखक खेमदेव हस्ते यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ.चंद्रकांत लेनगुरे यांनी केले. त्यातून त्यांनी मंडळाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. या एकदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शक दिलीप पाटील, प्रशांत भंडारे यांनी अतिशय रंजक पद्धतीने अरब, पर्शियातून भारताच्या विविध भाषांत आणि महाराष्ट्रातल्या मराठी भाषेत भिनलेल्या गझलचा इतिहास सांगितला. गझलचे मुसलसल, गैरमुसलसल, मुरद्दफ, गैरमुरद्दफ असे प्रकार तसेच शेर,मिसरा, कवाफी, अलामत, अशी अंगे समजावून सांगितली. शिवाय गझलांची विविध वृत्ते, व्याकरणाचे नियम, मात्रा मोजायच्या पद्धती अशी सविस्तर माहिती देत गझलचे तंत्र शिकवले. कार्यक्रमाचे संचालन कमलेश झाडे यांनी केले, तर आभार संजीव बोरकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा.विनायक धानोरकर, डॉ. प्रवीण किलनाके, पुरुषोत्तम ठाकरे, वर्षा पडघन, प्रतीक्षा कोडापे आदी मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले.










